सखलभाग जलमय : पाण्यातून वाट काढताना उडाली त्रेधा
नगर – आज दुपारी चारच्या दरम्यान शहर व उपनगरात जोरदार पाऊस झाल्याने नगरकरांची चांगलीच त्रेधा उडाली सकाळपासून चांगले उन पडले असताना दुपारी अचानक झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. झोडपणारा पाऊस पडेल याचा अंदाज नगरकरांना नव्हता त्यामुळे नगरकर काहीसे बेसावध होते.
मुसऴधार पावसाने चांगले तासभर झोडपल्याने शहरातील सखल भागात पाणी वाहायला सुरवात झाली, तेलीखुंट, चितळे रस्ता, गांधी मैदान, गौरी घुमट, लक्ष्मीकारंजा, पटवर्धन चौक, चौपाटी कारंजा, नालेगाव हा परीसर जलमय झाला होता. त्यात शाळा सुटायची वेळ असल्याने पालकांची आपल्या मुलांना घरी नेण्यासाठीची लगबग त्यामुळे रस्ते गजबजून गेले.अग्नीशमनदलाच्या कार्यालया जवळ पाणी साठल्याने त्यातून वाट काढतांना पालक व मुलांची मोठी त्रेधा उडतांना पहायला मिळाली.
आधीच रस्त्यांची दैना झालेली असतांना त्यात पाणी साठल्याने खड्ड्यांची कल्पना येत नव्हती त्यामुळे अनेक वाहने त्यातून मार्ग काढतांना अडखळत होती सिद्धीबाग ते न्यु आर्टस ऍन्ड कॉमर्स कॉलेज परीसरात नेहमी प्रमाणे आजही पाणी साठले होते. गेल्या महिनाभर या ठिकाणी मोठेमोठे पाइप टाकण्याचे काम करूनही त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही. त्याभागातूनही येजा करतांना नागरीकांना मोठी कसरत करावी लागत होती.