अवसरी- अवसरी खुर्दच्या पश्चिमेस असणारे तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील काळदरा पाझर तलाव शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे गावच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती सरपंच ज्ञानेश्वर भोर यांनी दिली.
आदर्श गाव तांबडेमळ्याच्या पश्चिमेस काळदरा पाझर तलाव आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून या भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता, परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने काळदरा पाझर तलाव पूर्ण भरला आहे. त्यामुळे सरपंच ज्ञानेश्वर भोर, गणेश भोर, वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी विजय वेलकर, बाळशिराम साबळे, वनरक्षक भालेराव, वनसेवक महादू तांबडे, रामदास शिंगाडे आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थित तलावाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.
गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाझर तलाव भरल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यासाठी वनविभागाचे अधिकारी प्रज्योत पालवे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निर्माण करण्यात आलेले सर्व बंधारे भरले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.