प्लॅस्टिक प्रक्रियेसाठी गावपातळीवर प्रयत्न व्हावेत

नगर – घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत शासनाने नवीन जी.आर.जारी केला आहे. त्यानुसार गावपातळीवर नियोजनपूर्वक काम करून योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पार पाडायची आहे. शासनाने ग्रामपंचायतस्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी क्‍लस्टर निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कचरा संकलन करताना अविघटनशील प्लॅस्टिक कचरा वेगळा करून त्याची शासन निर्देशानुसार योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. याबाबत गावपातळीवर चांगले काम होईल, यादृष्टीने संबंधितांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांनी केले.

केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व वर्ल्ड बॅंक संचलित घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत नवीन शासकीय जी.आर. काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने हागणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी टप्पा 2 हाती घेतले आहे. यासाठी नगरमध्ये नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना यादव बोलत होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय समन्वयक अरूण रसाळ, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, समाधान सोनवणे, गोविंद खामकर, शेखर शेलार, प्रशांत काळे, डॉ.वसंत गारुडकर, किशोर गिते, सचिन थोरात, दीपाली जाधव, अश्विनी जाधव, सय्यद सुन्नाबी, मनोज सकट, प्रशांत जगताप, किशोर म्हस्के, सागर आहेर आदी उपस्थित होते.

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवणे, त्याची छाननी करून प्रस्तावनिहाय अंदाजपत्रक तयार करणे, त्याची प्रशासकीय मंजुरी व प्रत्यक्ष निधी वर्ग करणे अशी कामे गतिमान पध्दतीने करण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. अरूण रसाळ यांनी ग्रामीण भागातील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामस्तरावर करायच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता आदी सहभागी झाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×