नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे दरम्यान, गुजरातचे पर्यटन मंत्री आणि भाजपा नेते वासन अहिर यांनी पक्षाला लाज आणणारी कृती केली. 10 ऑगस्ट रोजी कच्छमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी जेटलींना चक्क श्रद्धांजली वाहून टाकली. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयीची माहिती दिली आहे.
गुजरातच्या पर्यटनमंत्र्यांनी या कार्यक्रमात जेटलींना केवळ श्रद्धांजलीच वाहिली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिथे उपस्थित शेतकऱ्यांना आणि मान्यवरांसह दोन मिनिटांचे मौनही बाळगले. कच्छच्या मांडवी तालुक्यातील बिदाद गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदारांची ही चूक कोणतीही शहानिशा न करता कच्छच्या माहिती विभागाने तशीच पुढे रेटली. माहिती विभागाने या कार्यक्रमाची एक प्रेसनोट तयार केली. यामध्ये उपस्थित मान्यवरांनी आणि शेतकऱ्यांनी जेटलींना श्रद्धांजली वाहिल्याचे म्हटले होते.