काश्‍मीर प्रश्‍नावर आज संयुक्‍त राष्ट्र परिषदेत बंद खोलीत चर्चा

न्यूयॉर्क: जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. त्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानने घेवून गेला आहे. त्यातच आत आज सरकारच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चर्चा होणार आहे. चीनच्या मागणीमुळे बंद खोलीत ही चर्चा होणार असल्याचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पोलंड यांनी आज सकाळी 10 ची वेळ दिली आहे. याशिवाय हॉंगकॉंगमध्ये गेल्या 10 दिवसांपासून लोकशाहीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दादेखील संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला जाणार आहे. हॉंगकॉंगच्या विषयावरुन संयुक्त राष्ट्राने महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

1965 मध्ये सुरक्षा परिषदेच्या पूर्ण बैठकीत काश्‍मीर प्रश्नावर चर्चा झाली होती. त्यामुळे आजची चर्चा ही दुर्मीळ मानली जात आहे. आज होणारी बैठक पूर्ण स्वरुपाची असणार नाही. आजची बैठक बंद खोलीत होईल. काश्‍मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. तर या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप मान्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारताने आधीपासूनच घेतली आहे. काश्‍मीरचा मुद्दा अंतर्गत स्वरुपाचा असल्याने त्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही, यावर भारत ठाम आहे. शिमला करारानुसार काश्‍मीर प्रश्न पाकिस्तानसोबत संवादाच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो किंवा दोन्ही देशांची संमती असल्यास तिसऱ्या देशाची मदत घेतली जाऊ शकते. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे दोन्ही देशांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.