पुणे – धरणसाखळीतील खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव ही चार धरणे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
तरडेक्कन भागातील कोंडी टाळण्यासाठी दुचाकी वाहनांसाठी संभाजी पूल खुला करून देण्यात आला आहे, अशी माहिती डेक्कन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली. नदीपात्रातील रस्त्याचा वापर डेक्कन, कोथरूड, एरंडवणे तसेच मध्यभागात येणारे दुचाकीस्वार करतात. हा रस्ता बंद केल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठांसह अन्य रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे कोंडी होते.
महापालिका भवन ते शनिवार पेठेदरम्यानचा टिळक पूल शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवार पेठेतून शिवाजीनगर भागात जाणारे वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. दरम्यान, शुक्रवारी विसर्ग कमी केल्याने नदीपात्रातील रस्ता, भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला होता.