पुणे – पावसाने उघडीप घेताच, रस्ते दुरूस्तीला वेग आला आहे. शहरात सलग दोन आठवडे झालेल्या पावसाने खड्डे पडले असून वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे खड्ड्यांची यादीच दिली असून नागरिकांनीही ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. अशा ठिकाणी महापालिकेने रस्ते दुरूस्ती सुरू केली आहे.
जुलैमध्ये सलग 10 दिवस झालेल्या जोरदार पावसाने रस्ते खड्डेमय झाले होते. त्यामुळे पालिकेने युद्धपातळीवर जवळपास 1,800 खड्डे दुरूस्त केले. त्यानंतर 23 जुलैपासून 8 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम होता. परिणामी, दुरूस्त केलेल्या खड्ड्यांसह पुन्हा नवीन रस्त्यांवर तसेच नवीन ठिकाणी मोठे खड्डे पडले. मात्र, सतत पाऊस सुरू असल्याने तसेच भर पावसात खड्डे दुरूस्त करण्याचे कोणतेही ठोस तंत्रज्ञान नसल्याने खड्डे दुरूस्तीही जवळ्पास ठप्पच झाली आहे.