पिरंगुट – मुळशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पृडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे माले (ता. मुळशी) येथे पुणे-कोलाड मार्गावर दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे हा रस्ता लहान वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टी परिस्थिती असल्याने पर्यटकांनी मुळशीत येणे टाळावे, असे आवाहन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले आहे.
संभवे पुलाला पाणी लागल्याने संभवे पूल शनिवारी (दि. 3) रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे संभवे, वळणे, नानिवली, चांदिवली, शिरगाव, कुंभरी, पोमगाव, देवघर, विसाघर गावांतील लोकांना रावडे-भादस मार्गे प्रवास करावा लागत आहे. विसर्ग केल्याने छोट्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. पौडपासून मुळशी धरण परिसरात वर्षाविहारासाठी जाणाऱ्या पर्यटकांना परत पाठवण्यात येत आहे.