खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा म्हणण्याची वेळ : वाहनचालक रडकुंडीला
महाळुंगे इंगळे- चाकण पंचक्रोशीत गेल्या 15 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावर पाण्याची मोठ-मोठी डबकी साचल्याने रस्त्यावरच गटारगंगा तयार होवून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने वाहनचालकांसह प्रवासी रडकुंडीला आले आहेत. तर रस्ता दुरुस्त करण्याच्या नावाखाली केवळ मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा इशारा दिला आहे.
चाकण-तळेगाव दाभाडे या राज्य मार्गावर दिवसभर भरधाव वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरु असते. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता दुरुस्ती अभावी खड्ड्यात चालला असून, रस्ता दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. चाकण-तळेगाव या राज्य मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून, काही ठिकाणी मोठ्या आकारातील खड्डे पडल्याने धोका होण्याचा संभव आहे. या भागातील रस्त्यावर मोठ मोठे खेड्डे पडून रस्त्याची चाळण झाल्याने अनेक पादचारी व वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांची कच्च् स्वरूपाचे काम केल्याने पुन्हा त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांची गती मंदावून हा रस्ता वारंवार जाम होतो. प्रवाशांना तासन्तास प्रवासात अडकून बसावे लागत असल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावरील रस्त्याच्या साईड पट्ट्याही खचून ठिकठिकाणी वाहनांसाठी अपघाती जागा निर्माण झाल्या आहेत.
- वाढत्या खड्ड्यांमुळे अनेकांचे या रस्त्यावर नाहक बळी गेले आहेत. अनेकजण जायबंदी झाले असून, या राज्य मार्गावरील रस्त्याची त्वरित डागडुजी न केल्यास रस्त्यातील खड्ड्यांत झाडे लावली जाणार आहेत.
– संदीप येळवंडे, उपसरपंच, खालुंब्रे