दरीत अडकलेल्या तरूणाचे पोलिसांनी वाचवले प्राण, सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

लोणावळा – लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या दरीमध्ये 100 फूट खोल अंतरावर अडकून पडलेल्या एका मद्यधुंद अवस्थेतील तरूणाचे प्राण लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या साहसामुळे वाचले आहेत. निलेश भागवत (वय-27) असे दरीत पडलेल्या युवकाचे नाव आहे. 27 वर्षीय निलेश भागवत टायगर पॉईंट, लोणावळा येथील 100 फूट खोल दरीत पडला. तेव्हा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भूषण कुवर, मयूर अबनवे व हनुमंत शिंदे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने दरीत उतरून निलेशला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे त्याला वाचवणार्‍या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, निलेश आणि काही मित्र मुंबई येथून गटारी साजरी करण्यासाठी लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट येथे गेले होते. त्याठिकाणी निलेशने मद्यधुंद अवस्थेत टायगर पॉईंट येथे दरीच्या अगदी टोकावर जाऊन खाली बघण्याचा प्रयत्न केला. दारूच्या धुंदीत असल्याने या तरुणाचा तोल गेला आणि तो सुमारे 50 ते 60 फूट खाली दरीत घसरत गेला. सुदैवाने त्याच्या हाताला एक छोटे झाड लागल्याने त्याने ते पकडून ठेवले.

या घटनेची माहिती त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलिस कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी क्षणाचा विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम त्यांनी एक मोठी दोरी मिळवली आणि ती त्या खाली अडकलेल्या तरुणाच्या दिशेने फेकली. मात्र मद्यधुंद अवस्थेतील तरूणाला ती पकडून वर येणे जमत नव्हते. हे लक्षात येताच पोलिस कर्मचारी भूषण कुवर यांनी धोका पत्करत खाली अडकलेल्या निलेशपर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते अडकलेल्या तरूणांपर्यत पोहचले आणि निलेशच्या कमरेला ती दोरी बांधली. त्यानंतर स्थानिक नागरिक व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या तरूणाला खेचून दरीतून बाहेर काढले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.