नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. भारतीय स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंना खेळण्याची अनुमती द्यावी, असा प्रस्ताव अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयपुढे ठेवला होता. मात्र, बीसीसीआयने तो फेटाळून लावला आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भारतीय स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची अनुमती देणे शक्य नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटची निराशा झाली आहे. अफगाणिस्तानात गेल्या काही वर्षांत क्रिकेटचा दर्जा खूप उंचवला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या टीमने अनेक मातब्बर टीमना घाम फोडला होता. पण, अनुभवाच्या अभावी त्यांना विजय मिळवता आला नाही. परिणामी खेळाडूंना दर्जेदार खेळाचा आणि सामन्यांमधील दबावाचा अनुभव मिळावा, यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची धडपड सुरू आहे.
यासंदर्भात बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने म्हटले आहे की, बीसीसीआयकडून आयोजित भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंना सहभागी करून घेणे बीसीसीआयला शक्य होणार नाही. यापूर्वीही अफगाणिस्तानने असा प्रस्ताव बीसीसीआयपुढे ठेवला होता.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड 2018मध्ये अफगाणिस्तान प्रिमियर क्रिकेट लीग आयोजित करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याची अनुमती त्यांच्या बोर्डाने मागितली होती. हा प्रस्ताव उन्हाळ्यातील स्पर्धांसाठीच होता. पण, त्याकाळात भारतात आयपीएल सुरू असते. त्यामुळे बीसीसीआयने हा प्रस्ताव धुडकावला होता.