महाबळेश्वर – पुरुषोत्तम जाधव यांनी खंडाळा तालुक्यातील मंजूर असणाऱ्या ट्रामा केअर सेंटरला आवश्यक असणारा निधी मिळावा ही मागणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली. यावेळी मंत्रीमहोदयांनी या विषयावर तात्काळ कार्यवाही करावी अशा प्रधान सचिवांना लेखी सुचना दिल्या.
तसेच या विषयासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते, परिवहन मंत्री ना.दिवाकरजी रावते यांचे शिफारस पत्र घेतले. खंडाळा तालुक्यात नॅशनल हायवे, घाट रस्ता, एस कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. पण शासकीय ट्रामा सेंटर नसल्यामुळे योग्य उपचार वेळेत न मिळाल्यामुळे जीवितहानी होत असते. तसेच खंडाळा तालुक्यातील जनतेला देखील आरोग्य सेवा मिळत नाहीत.
नुकतीच खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावे असलेली जमिन व इमारती संचालक आरोग्य सेवा मुंबई (ग्रामीण रुग्णालय) यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रामा केअर सेंटर जागेचा प्रश्न मार्गी लागला होता. परंतु निधीअभावी काम प्रत्यक्षात सुरू होत नव्हते. आता ट्रामा केअर सेंटरचा प्रश्न मार्गी लागत असून भविष्यकाळात तालुक्यातील गोरगरीब जनतेला व हायवेवर प्रवास करणाऱ्या अपघातग्रस्तांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.