मागील सभांच्या इतिवृत्त मुद्द्यांवरून प्रशासनालाही धरले धारेवर; अकरा विषयांना मंजुरी
फलटण – मागील सभांचे इतिवृत्त वाचण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच मागील सभांचे इतिवृत्त जोपर्यंत कायम होत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला. दरम्यान, बुधवारी झालेल्या फलटण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांची सुमारे साडेतीनतास खडाजंगी झाली. नगराध्यक्षा नीताताई नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत एक विषय मतावर घेत 11 विषयांना मंजुरी मिळाली. तर एक विषय तहकूब करण्यात आला.
या सभेस मुख्याधिकारी प्रसाद काटकर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेविका, नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच मागील काही सभांचे इतिवृत्त वाचून ते मंजूर करण्याबाबतचा विषय विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, सचिन बेडके, अनुप शहा, सचिन अहिवले यांनी मांडला. तसेच जोपर्यंत मागील इतिवृत्त कायम होत नाही तोपर्यंत सभा चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला. इतिवृत्तच्या मुद्यावरुन मुख्याधिकारी काटकर यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले. नगराध्यक्षा नीताताई नेवसे यांनी मागील इतिवृत्त वाचन करण्यास सांगितल्यावर मागील तीन सभांचे इतिवृत्त कायम झाले नसल्याचे अधिकाऱ्याकडून उघडकीस आले. यावर नगराध्यक्षा नेवसे यांनी पुढील सभेत सर्व मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यात येईल अशी ग्वाही दिल्यावर तसेच या प्रकाराबाबत दोषी असल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर विरोधक शांत झाले.
विषय पत्रिकेवरील विषय नंबर नऊच्या विषयावरही प्रचंड वादळी चर्चा झाली. प्रभाग क्रमांक सहामधील नगरपालिका मालकीच्या जागेत शनिनगर येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आठ लाख रुपये मंजूर करण्याच्या ठरावावरुन विरोधकांनी यापूर्वी शनिनगर भागात विविध विकासकामे झाली असून त्यात आत्तापर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील मागितला. तसेच याचा सर्वे नंबर मागून त्याचा मालकी हक्क कोणाचा असा प्रश्न उपस्थित केला. यावरुनही विरोधकांनी अधिकारी वर्गाला सविस्तर माहितीबाबत धारेवर धरले. मुख्याधिकारी यांनी तपशील देण्यास सांगितल्यावर अधिकारी वर्गाकडून तपशील देताना यापूर्वी 25 लाख रुपये एका कामावर खर्च झाल्याचे सांगण्यात आले.
ज्या कामावर 25 लाख खर्च झाले ते काम प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे संबंधित अधिकारी यांनी स्पष्ट केल्यावर संतप्त विरोधकांनी सत्ताधारी व प्रशासनाला धारेवर धरले. तसेच याची चौकशी होईपर्यंत हा विषय स्थगित करण्याची मागणी सचिन बेडके, अनुप शहा यांनी केली. यावेळी आरोग्य सभापती अजय माळवे आणि अनुप शहा यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाली.
शहरातील भुयारी गटर योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून संबंधित काम निकृष्ठ झाले असून याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावर मुख्याधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर विरोधक शांत झाले. यावेळी आरोग्य सभापती अजय माळवे आणि विरोधीपक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात तुतु-मैमै झाली.
नगरपालेकेला एखादी लेखी माहिती कोणत्याही नगरसेवकानी मागितली तर ती दिली जात नाही, नगरसेवकांना प्रशासनाकडून गृहीत धरले जात नाही, हा सदस्यांचा अपमान असल्याचे सांगत समशेरसिंह यांनी या विषयावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विरोधकांच्या आरोपापुढे वस्तुस्थिती मान्य करीत यापुढे त्वरित माहिती देण्याचे आदेश काटकर यांनी दिले. शहरातील मुताऱ्यांच्या दुरवस्थेबातही सचिन बेडके, सचिन अहिवले या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यावर आरोग्य सभापती अजय माळवे यांनी अनेक ठिकाणी मुताऱ्या मंजूर केल्या असून त्याची कामे लवकर सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले.