कराळे-सातपुते गटांत हाणामारी : तडीपार गुंड जखमी
नगर – केडगाव उपनगरात सोमवारी रात्री शिवसेना कार्यकर्ते व तडीपार गुंड मनोज कराळे यांच्यात राडा झाला. जी घटना जुन्या राजकीय वादातून घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेत मनोज कराळे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्याविरुद्धही विरोधी गटाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मनोज कराळे व सुनील सातपुते यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यापासून हा वाद आणखीनच चिघळला. सातपुते व कराळे हे दोघे वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच कुरघोडी होतात. सोमवारी रात्री तडीपार असलेला मनोज कराळे हा केडगाव येथे आला होता. पीडब्ल्यूडी वर्कशॉप रोडवरील हॉलीबॉल मैदान येथे कराळे याला मारहाण करण्यात आली. मागील वादात व राजकीय कारणातून त्याला लोखंडी गज, लाकडी दांडके, तलवारीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कराळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जखमी मनोज कराळे याची आई मीना भाऊसाहेब कराळे (वय -42, रा. शिवाजीनगर मराठी शाळेजवळ) यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल नानाभाऊ सातपुते, सुनील सातपुते, नितीन भालसिंग, प्रवीण सातपुते, आशिष शिंदे, महेश साके, अशोक सातपुते, अनिकेत शिंदे (सर्व रा. केडगाव, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विठ्ठल सातपुते याला रात्री अटक करण्यात आली आहे. विरोधी गटाच्या विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांनीही कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉलीबॉल मैदान येथे मनोज कराळे हा शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली असता त्याने चाकूने वार केले.