पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाला नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेससाठी डेपो, पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी पीएमपीएमएलने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे पाच जागांची मागणी केली होती. मात्र, प्राधिकरणाकडून त्यांना 11 महिन्यांच्या भाडेकराराने तीन जागा दिल्या जाणार आहेत. संबंधित जागांसाठी सवलतीची अधिमूल्य रक्कम म्हणून पीएमपीएमएलला 93 लाख 209 रुपये प्राधिकरणाकडे जमा करावे लागणार आहे.
पीएमपीएमएलकडून सीएनजी, डिझेल बसची नव्याने खरेदी केली जात आहे. त्याशिवाय, इलेक्ट्रिक बसची खरेदी होणार आहे. त्यासाठी शहरामध्ये स्वतंत्र डेपो, पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेता पीएमपीएमएलकडून प्राधिकरणाकडे रावेत (पेठ क्रमांक 29), भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र, पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रालगत (मोशी) पेठ क्रमांक 5 व 8 येथील जागा, वाकड (पेठ क्रमांक 38) आणि मोशी (पेठ क्रमांक 11) अशा पाच ठिकाणी असलेल्या जागांची मागणी करण्यात आली होती. संबंधित जागा विकसित करून हस्तांतर कराव्यात, अशी पीएमपीएमएलची मागणी होती. प्रत्यक्षात प्राधिकरणाने त्यांना रावेत – 8 हजार चौरस मीटर, भोसरी – 8 हजार 540 चौरस मीटर, औद्योगिक प्रदर्शन केंद्रालगतची जागा (मोशी) – 6 हजार 300 चौरस मीटर येथील जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. या जागा सध्या आहे त्याच स्थितीत पीएमपीएमएलला दिल्या जाणार आहेत.
“पीएमपीएमएल’ला जागा देण्याचा प्रस्ताव 17 नोव्हेंबर 2018 ला प्राधिकरण सभेत मंजुर झालेला आहे. त्यानुसार तीन जागा 11 महिन्यांच्या भाडेकराराने पीएमपीएमएलला दिल्या जाणार आहेत. पुढील आठवडाभरात पीएमपीएमएलकडून त्याचे अधिमूल्य मिळणार आहे. त्यानंतर त्यांना जागांचा ताबा दिला जाईल.
– मनीषा कुंभार, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण