राहुरी: तालुक्यातील मोमीन आखाडा येथे बिबट्याने झडप घालून दोघांना जखमी केल्याची घटना घडली. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सुमारे शेकडो ग्रामस्थांनी नऊ तास अथक परिश्रम घेतले. दुपारी चार वाजे दरम्यान बिबट्याला शूट करून इंजेक्शन देण्यात आले. बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजऱ्यात घालून बंदी करण्यात आले.
सकाळी सात वाजेदरम्यान राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील बाळेश्वर मंदिर परिसरात आबासाहेब शिंदे यांच्या 10 गुंठे क्षेत्र असलेल्या कडवळीच्या शेतात अचानकपणे बिबट्या आला आणि त्याने काही कुत्र्यांवर हल्ला केला.
यावेळी तेथे असलेले भाऊसाहेब माळी आणि रितेश बाबासाहेब कदम यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जबर जखमी केले. रितेश कदम याच्या मानेला व हाताला बिबट्याने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना तत्काळ नगर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी जी. एन. लोंढे, व्हि. पी. लांबे, एस. एम. गायकवाड, एल. जी.किनकर, बी. एम. गाडे, चालक ताराचंद गायकवाड यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. सुमारे तीन ते चार तास प्रयत्न करून देखील बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता.
सरपंच अशोक कोहकडे, बिट हवालदार संजय जाधव तसेच अरिफ शेख, शब्बीर शेख, मतीन शेख, राजू शेख, पापाभई शेख, किशोर कोहकडे, बापू कोहकडे, अर्जून कदम, अमोल शिंदे यांच्यासह शेकडो नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. मात्र दुपारपर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते.
दुपारी साडेतीन वाजेदरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोणी येथील संतोष पारधी व पी. जे. पूंड यांना पाचारण करून अखेर बिबट्याला शूट करून इंजेक्शन देण्यात आले. सुमारे चार वाजेदरम्यान बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजऱ्यात घालून बंदी करण्यात आले. सुमारे नऊ तासाच्या अथक प्रयत्ना नंतर बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.