कोल्हार खुर्दच्या जिल्हा बॅंकेत दोनच कर्मचारी पाहतात कारभार
कोल्हार खुर्द: राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत जवळपास सहा ते सात हजार खातेदारांचे कामकाज पाहणे, तसेच लाईट बिल भरणा, विविध शासकीय योजनांचे अनुदान, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अवघे दोन कामगार उपलब्ध असल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि खातेदारांना बॅंकेत तासन्सास उभे राहण्याची वेळ येत असल्याने बॅंकेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोल्हार खुर्द येथे जिल्हा बॅंकेची शाखा आहे. या बॅंकेत गावातील जवळपास 90 टक्के ग्रामस्थांचे व्यवहार नेहमी सुरू असतात. तसेच वीजबिल भरणा, गावातील जवळपास 100 ते 125 महिला आणि पुरुषांचे बचत गट, विविध शासकीय योजनांचे अनुदान, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, विधवा महिलांचे डोल, तसेच अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी या गावात एकमेव जिल्हा बॅंकेची सुविधा आहे.
वरील सर्व खातेदार तसेच लाभार्थ्यांना अनेकदा या बॅंकेच्या दारात जावे लागते, परंतु कोल्हार गाव एक ग्रामीण भागात असल्याने या गावात राहणारे जवळपास 90 टक्के ग्रामस्थ हे कष्टकरी असल्याने, त्यांना रोजंदारीने कामं करण्यासाठी वेळेवर जावे लागते. मात्र खातेदारांची कामे करण्यासाठी बॅंकेत पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने बॅंकेच्या दारात तासन्तास उभे राहण्याची वेळ येत आहे. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांचे अनुदान जमा झाल्यानंतर, अनेकदा गावातील बचत गट, लाईट बिल भरणा, बॅंकेचे खातेदार, त्याच प्रमाणे जेष्ठ आणि विधवा महिलांचे डोल यांची एकच गर्दी झाल्यानंतर सर्वच प्रकारचे व्यवहार करताना बॅंकेतील कर्मचाऱ्यांनादेखील तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे गावातून बॅंकेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.