पुणे – पुणे विभागाच्या वतीने लोणावळा आणि पुणे स्थानकादरम्यान दि. 3 जून रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान सिग्नल आणि “ओएचई’ आदी तांत्रिक बाबींच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या कालावधीत लोणावळा ते पुणे स्थानकांदरम्यान काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
पुणे स्थानकातून सकाळी 11.15, दुपारी 12.15 आणि 1 वाजता सुटणाऱ्या पुणे ते लोणावळा लोकल (99814 , 99816, 99818) रद्द करण्यात आल्या आहेत. तर लोणावळा स्थानकातून पुण्याला सकाळी 11.30, दुपारी 2 आणि 2.30 वाजता सुटणाऱ्या लोणावळा ते पुणे लोकल (99811, 99813, 99815) रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी “पुणे-पनवेल पॅसेंजर (51318)’ आणि दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी सुटणारी “पनवेल-पुणे पॅसेंजर (51317)’ रद्द करण्यात आली आहे.
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (11026) आणि भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (11025) मनमाड-दौंडमार्गे धावणार आहेत. तर मुंबई (सीएसएमटी)-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस (16331) लोणावळा ते तळेगाव स्थानकांदरम्यान 35 मिनिटे थांबविण्यात येणार आहे.