मुंबई – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचे संकेत देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून महागाई, बेरोजगारी या मुद्यांवरुन सरकारला लक्ष्य केले आहे. मागच्या पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबवून 2019 साली बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.
महाराष्ट्र व देशाचे चित्र विदारक आहे. शेती जळून गेली व हाताला काम नाही या चक्रात सापडलेल्या शेतकऱयांनीही नवी आशा घेऊन मोदी यांना मतदान केले आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ याच मंत्रावर विश्वास ठेवून कोट्यवधी बेरोजगार तरुणांनीही मोदी यांच्या विजयास हातभार लावला आहे. त्यामुळे मागच्या पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबवून 2019 साली बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. महागाई, बेरोजगारी, घटते उत्पादन व बंद पडत चालेले उद्योग या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. अर्थव्यवस्था संकटात आहे. नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा.
‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के झाला. मागील 45 वर्षांतला हा सर्वात जास्त आकडा आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयानेदेखील त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे. बरं, हे आकडे सरकारचेच आहेत, आमचे नाहीत. सरकार पक्षाचे म्हणणे असे की, बेरोजगारी वाढत आहे हे काही आमचे पाप नाही. बेरोजगारीचा प्रश्न हा काही गेल्या पाच वर्षांत भाजपने तयार केलेला नाही असे श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. आम्ही त्यांचे मत मान्य करतो, पण दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन होते व त्या हिशेबाने मागच्या पाच वर्षांत किमान दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते ते झालेले दिसत नाही व त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही. सत्य असे आहे की, रोजगारनिर्मितीत सातत्याने घट होत आहे. केंद्र सरकारच्या नोकर भरतीत 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली.