पुनरागमन करण्यास पाकिस्तानचा संघ उत्सुक
स्थळ – ट्रेंटब्रिज
वेळ – दु. 3.00 वा
लंडन – विश्वचषक स्पर्धेची थाटात सुरूवात करणाऱ्या धडाकेबाज इंग्लंडसमोर आज गेल्या काही काळापासुन खराब कामगिरी करत असलेल्या पाकिस्तानचे आव्हान असुन आजच्या सामन्यात विजय मिळवून लागोपाठ 11 सामन्यातील पराभवांचा सिलसिला मोडण्यास पाकिस्तानचा संघ उत्सुक असतानाच स्पर्धेतील आपली विजयी लय कायम राखण्यास इंग्लंडचा संघ प्रयत्नशील असणार आहे.
2015 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतच पराभवाचा सामना करावा लागलेल्या इंग्लंडच्या संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने सरावाला सुरूवात करत प्रशिक्षकापासुन ते संघाच्या शैलीपर्यंत सर्व गोष्टी बदलत संघामध्ये कमालीची ताकत निर्माण केली असुन सध्या इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात असुन विश्वचषक स्पर्धेपुर्वी झालेल्या सराव सामन्यात त्यांनी पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणाऱ्या अफगाणिस्तानचा एकतर्फी पराभव करत हे दाखवुन दिले होते. त्याच प्रमाणे इंग्लंदने विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला देखील सहज पराभुत करत स्पर्धेला सकारात्मक सुरूवात केली होती.
आजच्या सामन्यात इंग्लंडच्या संघात प्रमुख वेगवान गोलंदाज मार्क वूड परतण्याची शक्यता असुन वूडच्या समावेशाने इंग्लंडची गोलंदाजांची फळी आणखीनच मजबूत होईल यात शंका नाही. त्यातच आजचा सामना फलंदाजांसाठी नंदनवन समजल्या जाणाऱ्या ट्रेंटब्रिज येथील खेळपट्टीवर असुन
या पुर्वी या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने 2016मध्ये पाकिस्तानविरुद्ध 3 बाद 444 धावा आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय संघाविरुद्ध 6 बाद 481 धावांच्या विक्रमी खेळी आपल्या नावावर केल्या आहेत. त्यातच 2015 नंतर इंग्लंडच्या संघाने 16 वेळा 350पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला. तर, चार वेळा 400पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. जेसन रॉय, बटलर आणि बेअरस्ट्रो यांचा तडाखा असाच कायम राहिला तर घरच्या वातावरणातील फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टयांवर इंग्लंडचा संघ 500 धावांपर्यंतही सहज मजल मारु शकेल.
तर, दुसरीकडे पाकिस्तानचा संघ गत काही काळा पासुन पराभवाच्या गर्तेत अडकला असुन त्यांनी विश्वचषक स्पर्धेपुर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांविरुद्धच्या मालिका एकतर्फी गमावल्या होत्या. तर विश्वचषकापुर्वी झालेल्या सराव सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभवाचा धक्का पचवत विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना 7 गडी आणि 218 चेंडू राखुन गमावला होता. त्यामुळे सध्या पाकिस्तानचा संघ कमालिचा बॅकफुटवर पडलेला असुन एखादा विजय देखील त्यांच्या संघाला स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी पुरेसा ठरु शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयासाठी सर्वस्वपनाला लावेल हे नक्की.
प्रतिस्पर्धी संघ –
इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लीयाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.