पुणे – ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा, की सरपंचाचा?

पुणे – गावकरी पाण्यासाठी वणवण फिरत असताना ग्रामसेवक आठ-आठ दिवस गायब असतात. त्यांना काय सांगितले तर त्याकडेही दुर्लक्ष करतात. नक्की ग्रामसेवक जिल्हा परिषदेचाच आहे का? असा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित करत, जे ग्रामसेवक कामात हलगर्जीपणा करत असतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सदस्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाईची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पाण्याचे नियोजन करायचे असल्यास ग्रामसेवक गावात असणे आवश्‍यक आहे. मात्र, ग्रामसेवकच गायब असल्यामुळे पाण्याचे नियोजन कसे होणार. या तक्रारी केवळ शिरूर, दौंड तालुक्‍यातील नसून, मुळशी, हवेली, जुन्नर, खेड यांसह अन्य तालुक्‍यातील काही गावांमध्येही आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामसेवकाला एखादी सूचना केली, तर ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याबाबत विचारणा केली असता, “करतो करतो’ असे म्हणून वेळ मारून नेतात. काही जण तर फोनच उचलत नाही. हेच सरपंचाने काम सांगितले तर लगेच करतात. त्यामुळे “नक्की ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा आहे, की सरपंचाचा’ असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर म्हणाले, “ग्रामसेवक हे जिल्हा परिषदेचे असून, यापुढे जे ग्रामसेवक कोणतीही कल्पना न देता गावात नसतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच सदस्यांच्या सूचनेनुसार सर्व ग्रामसेवकांना ताकीद देण्यात येईल,’ असे आश्‍वासन दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.