पोलीस प्रशिक्षकांना शासनाची ‘सलामी’

‘उत्कृष्ट प्रशिक्षक’ म्हणून होणार गौरव : शिक्षक दिनीच पुरस्काराचे वितरण

पिंपरी – पोलीस दलातील प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थीचे होणाऱ्या प्रशिक्षणावरच त्यांची पुढची सेवा कशी राहील याची दिशा ठरत असते. त्यामुळे, पोलीस दलात प्रशिक्षण केंद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवीन पोलिसांना ट्रेनिंग देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी राज्यभरातील ट्रेनिंग सेंटरमधून उत्कृष्ठ प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करुन त्यांना “उत्कृष्ट प्रशिक्षक’ हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पोलीस भरतीसाठी निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी त्या उमेदवाराला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात येत असते. गृहविभाकडून पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन अधिकाधिक चांगले पोलीस कर्मचारी मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. प्रशिक्षण केंद्रात नियुक्त केलेले अधिकारीही प्रचंड मेहनत घेवून या प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या प्रकारचे धडे देत असतात.

मात्र, चांगले प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस दलामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही माध्यमातून कौतुकाची थाप मिळत नव्हती. हीच बाब लक्षात घेवून पोलीस कर्मचाऱ्यांच्या 49 व्या सभेमध्ये प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात यावा अशी बाब मांडण्यात आली होती. ही बाब लक्षात घेवून आता गृह विभागाने राज्यात पोलीस दलामार्फत चालवण्यात येणाऱ्या सर्वच प्रशिक्षण केंद्रामधून चांगले प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याला “आदर्श प्रशिक्षक’ म्हणून गौरव करण्याचे ठरवले आहे.

त्यानुसार, राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, पोलीस बिनतारी संदेश विभाग प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र पोलीस अकादमी, फोर्स वन प्रशिक्षण केंद्र, मोटर परिवहन चालक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, गुन्हे अन्वेषण विभागातील श्‍वान प्रशिक्षण केंद्र, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र या प्रशिक्षण केंद्रामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आंतरवर्ग व बाह्यवर्ग असे दोन स्वतंत्र “आदर्श प्रशिक्षक’ पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.

हे असणार निकष…

आदर्श प्रशिक्षक ठरवण्यासाठी 12 निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याने सलग दोन वर्ष पोलीस प्रशिक्षण संस्थेत सेवा पूर्ण केलेली असावी, मागील पाच वर्षात शिक्षा झालेल्या नसाव्यात, गोपनीय शेरे कमीत कमी 3 असावे, वर्गवारी ब दर्जापेक्षा कमी नसावी, प्रशिक्षणार्थी साठी केलेल्या ऍक्‍टीव्हीटी, शिकवण्याची पद्धत, उपक्रमामध्ये सहभाग याचा समावेश आहे.

समितीच्या माध्यमातून होणार निवड

आदर्श प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी प्रशिक्षण व खास पथकाचे अप्पर पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अस्थापनेचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अकादमीचे, नाशिकचे सहा. संचालक, व प्रशिक्षण व खास पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.