बेळगाव – कन्नड विचारवंत आणि प्रसिद्ध लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी बेळगावातून एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या प्रकरणी एकाला अटक केली आहे. एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार बेळगावातील रहिवासी प्रविण प्रकाश चतुर याला अटक केली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या प्रविण चतुर याला 7 जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कलबुर्गी यांनी मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितले होते.
जून 2014 मध्ये अंधश्रद्धा विरोधी विधेयकावर चर्चा सुरु असताना कलबुर्गी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू. आर. अनंतमूर्ती यांचा संदर्भ देऊन मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या वक्तव्यामुळे कलबुर्गी यांना हिंदू विरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे आरोपीने सीआयडीला तपासादरम्यान सांगितले होते.