परीक्षा केंद्रावर दोन तास आधी उपस्थित राहणे आवश्यक
पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा दि. 2 जून रोजी होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व उमेदवारांनी दोन तास अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या रविवारी होत असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात येत आहे. यूपीएससीची पूर्व परीक्षा पुण्यातही एकूण 73 उपकेंद्रावर होणार आहे. पुण्यात 30 हजार 291 उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी पुणे हे केंद्रप्रमुख म्हणून कामकाज पाहत आहेत. उपजिल्हाधिकारी व तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व उमेदवारांनी दोन तास अगोदर नेमून दिलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पहिल्या पेपरसाठी 9 वाजून 20 मिनिट व दुसऱ्या पेपरसाठी 2 वाजून 20 मिनिटांनतर परीक्षा कक्षात कोणत्याही उमेदवारास प्रवेश मिळणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळेच्या बाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी उमेदवारांकडे हॉलतिकीट असणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर छायाचित्र असलेले ओळखपत्र अनिवार्य आहे.