पुणे – महापालिकेच्या हद्दीतील मिळकतधारकांनी पाच आणि दहा टक्के सवलत घेत मागील दोन महिन्यात 699 कोटी 81 लाक 62 हजार 690 रुपये मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. यामध्ये 5 लाख 52 हजार 832 मिळकतधारकांनी आपला मिळकतकर भरला असून, यापैकी 3 लाख 2 हजार 458 मिळकतधारकांनी ऑनलाइन व्यवहाराद्वारे 319 कोटी 57 लाख 78 हजार 454 रुपये जमा केले आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त मिळकतकर जमा करण्यासाठी प्रयत्न चालवले आहे. याचाच एक भाग म्हणून नियमीत कर भरणाऱ्यांना पंडीत दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेसह एप्रिल आणि मे या महिन्यात मिळकतकर जमा करणाऱ्यांना 5 ते 10 टक्के सूट, अशा योजनांचा लाभ देण्याचे जाहीर केले. त्यानुसार हा कर जमा झाला आहे. मिळकतकरामध्ये सूट मिळण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 31 हजार 955 मिळकतधारकांनी 47 कोटी 70 लाख 68 हजार 964 रुपये मिळकतकर जमा झाला आहे.
गतवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात 5 लाख 51 हजार 828 मिळकतदारांनी 666 कोटी 57 हजार 929 रुपये मिळकतकर जमा केला होता. त्यात 2 लाख 77 हजार 85 मिळकतधारकांनी 266 कोटी 73 लाख 36 हजार 975 रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 33 कोटी 81 लाख 4 हजार 761 रुपये जास्त मिळकतकर जमा झाला आहे. शिवाय मिळकतकर भरणाऱ्यांची संख्याही जवळपास पाच हजारांनी वाढलेली आहे. चालू आर्थिक वर्षाचा मिळकतकर ज्यांनी भरला नाही, अशा मिळकत धारकांनी आपला कर जून महिना अखेरपर्यंत भरावा, अन्यथा 1 जुलैपासून पहिल्या सहा महिन्यांच्या करावर दरमहा चक्रवाढ पद्धतीने 2 टक्के व्याज दंड स्वरूपात आकारला जाणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.