जॅमर लावल्याचे कारण : तिघांना अटक
जॅमर चोरल्यास गंभीर गुन्हा
शहरात वाहतूक पोलिसांनी वाहनांना जॅमर लावल्यावर जॅमर तोडून तसेच चोरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहनचालक दंड भरण्याऐवजी जॅमर चोरुन नेण्यास प्राधान्य देतात. मात्र दंडापेक्षा जॅमर चोरुन नेल्यावर कायद्यानुसार गंभीर गुन्हा होतो. जॅमर चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर अटक केली जाते.
पुणे – आपत्कालिन विभागासमोर दुचाकी लावल्याने ससून प्रशासनाने दुचाकीला जॅमर लावले. यानंतर तिघांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
विजय अप्पा मोहिते (29), निखील शंकर आरणे (25), शैलेश संजय कांबळे (20, तिघे रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. डॉ. प्रशांत दरेकर (27) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील आपत्कालिन विभागात डॉ. दरेकर वैद्यकीय अधिकारी आहेत. मोहिते, आरणे, कांबळे यांनी शुक्रवारी रुग्णालयाच्या आपत्कालिन विभागासमोर दुचाकी लावली. रुग्णालय परिसरात वाहनतळाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहने लावणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येते.
सुरक्षारक्षकांकडून चाकांना जॅमर लावण्यात येतो. मध्यरात्री अडीचच्या सुमारास डॉ. दरेकर ड्युटीवर होते. त्यावेळी मोहिते, आरणे, कांबळे तेथे आले. त्यांनी “कारवाई का केली?’ अशी विचारणा केली. तेव्हा “दंडाची रक्कम प्रशासनाकडे जमा केल्यानंतर सुरक्षारक्षक चाकांना लावलेला जॅमर काढतील,’ असे डॉ. दरेकर यांनी तिघांना सांगितले. तिघांनी परस्पर दुचाकीच्या चाकाला लावलेला जॅमर तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. दरेकर यांनी हस्तक्षेप करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तिघांनी डॉ. दरेकर यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एम. पाटील तपास करत आहेत.