नवी दिल्ली – युपीए सरकारच्या काळात एअर इंडियासाठी झालेल्या विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी ईडीने तत्कालिन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी केली असून त्यांना पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पटेल हे सध्या राज्यसभा सदस्य असून ते 6 जून रोजी या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहतील. दरम्यान या चौकशीला आपण आनंदाने हजर राहुन त्यांना पुर्ण सहकार्य करू असे पटेल यांनी म्हटले आहे. या व्यवहारातील गुंतागुत ईडीच्या लक्षात आणून देणे आपल्याला आवडेल असे त्यांनी म्हटले आहे.
मनि लॉड्रिंगच्या प्रकरणाची चौकशी करताना विमान वाहतूक खात्याशी लॉबिंगचे काम करणाऱ्या दीपक तलवार यांच्याकडून पटेल यांच्याविषयीची काही माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. तलवार हे पटेल यांच्या कायम संपर्कात होते अशी माहिती ईडीला मिळाली आहे.