घुसखोरांना मदत करणारे रॅकेट उघडकीस
इम्फाळ – मणिपुर मध्ये नऊ रोहिंग्य मुस्लिमांना तेग्नोैपाल जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडे बनावट आधार कार्डे सापडली आहेत.पोलिसांनी सांगितले की आम्हाला गुप्तचर सूत्रांनी रोहिंग्य मुस्लिमांनी या हद्दीत प्रवेश केल्याची माहिती कळवली. त्यानुसार आम्ही कारवाई करून 27 मे रोजी त्या जिल्ह्यातील चेकपोस्टवर दोन महिलांसह चार घुसखोरांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरेह गावात 28 मे रोजी अन्य पाच रोहिंग्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करताना असे समजले की एका ताहीर अली नावाच्या रोहिंग्य मुस्लिमाने स्थानिक मणिपुरी मुस्लिम महिलेशी विवाह केला असून तो तेथेच स्थायिक झाला आहे. तो अन्य रोहिंग्य मुस्लिमांना भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे आणण्यासाठी रॅकेट चालवत आहे.
त्याने बनावट आधार कार्डे तयार केली आहेत. तसेच रेशन कार्डे आणि अन्य भारतीय कागदपत्रे तो बनावट पद्धतीने तयार करून रोहिंग्यांना भारतात आणत असे. या ताहिर अलिला शुक्रवारी थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या रोहिंग्याना हिंदी किंवा इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात अडचणी येत आहेत. सीमावर्ती राज्यांत रोहिंग्य मुस्लिमांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे. बांगलदेशातून हे लोक भारतीय हद्दीत येत आहेत. त्यांच्या घुसखोरीला आळा घालणे ही एक मोठीच डोकेदुखी सध्या सुरक्षा दलांपुढे निर्माण झाली आहे.