पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयातील नवीन इमारतीत सुरू करण्यात आलेल्या “हिरकणी’ या स्तनपान कक्षाचे मंगळवारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत, न्यायाधीश पी. सी. भगुरे उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या या कक्षाचे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनाचे औचित्य साधून या उद्घाटन करण्यात आले.
तळमजल्यावर हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयात येणाऱ्या महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या लहान मुलांना स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन याठिकाणी “स्तनपान कक्ष’ सुरू करण्यात यावा, अशी मागणी वारंवार यापूर्वी करण्यात येत होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे जिल्हा न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.