सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील शेगांव येथे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास वाळू व्यवसायिक सुरेश उर्फ महादेव पाटील यांच्यावर गोळीबार झाला असून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू झाला आहे. गावातील सरपंच पिंटू पाटील यांनी महादेव पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. भावकी तसेच पोलीस पाटील कोणी व्हायचे यावरुन दोघात वाद सुरु आहे. त्यातच वाळू व्यवसायातील वैमनस्यही उफाळून आल्याने हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले.
अलीकडेच महादेव पाटील यांच्या वाळू ठेक्यांवर तालुका प्रशासनाने कारवाई केली होती. ही कारवाई होण्यामागे पिंटू पाटील आहेत असा संशय महादेव पाटलांना आहे. यातूनच दोघांत वाद झाला त्याचे पर्यावसन गोळीबारात झाले.
महादेव यांच्या उजव्या कंबरेच्या बाजूस गोळी लागली आहे. महादेव पाटील यांना त्यांचे काका गुरुनाथ पाटील यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.