संख्या घटली ः यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली परीक्षा
निकाल 4 जून रोजी
राज्य सीईटी सेलने परीक्षेचे योग्य पद्धतीने नियोजन केले होते. तसेच ऑनलाइन परीक्षेची भीती वाटू नये, यासाठी ठिकठिकाणी सराव परीक्षेची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. या सीईटीचा निकाल 4 जून 2019 रोजी जाहीर होणार असल्याचे राज्य सीईटी सेलमार्फत कळविण्यात आले आहे.
पुणे – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत 27 हजार 104 एवढी घटली आहे. गतवर्षी 4 लाख 19 हजार 408 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने एमएचटी-सीईटी परीक्षा दिली होती. यंदा ऑनलाइन पद्धतीने 3 लाख 92 हजार 304 विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षा दिल्याचे राज्य सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात राज्य सीईटी सेलने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करून एमएचटी-सीईटी परीक्षार्थ्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली. ही सीईटी 2 ते 13 मे रोजी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. एकूण 4 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हॉलतिकीटच डाऊनलोड केली नसल्याचे राज्य सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.
यावर्षी पहिल्यांदाच ही सीईटी ऑनलाइनद्वारे घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संख्या घटली असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. जवळपास सीईटी परीक्षेसाठी 4 लाख 13 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 92 हजार विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन सीईटी परीक्षा दिली. यावर्षी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे पहिलेच वर्ष असल्याने काही विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे गेले नसल्याचे दिसून येत आहे.