पुणे – ससून रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागात कॉकलियर इम्प्लांट शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ए.डी.आय.पी.च्या केंद्रशासनाच्या योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त भारतातील कॉकलियर इम्प्लांट सर्जरीचे आद्य प्रणेते पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने आणि डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑडिओलॉजि सेटअप उभारण्यात आल्याची माहिती ससून रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
जन्मतः पूर्णपणे मूकबधिर असलेल्या मुलांना आणि श्रवण यंत्र वापरूनही फायदा होत नाही अशा मुलांना कॉकलियर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा अधिक फायदा होतो. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना स्वावलंबी बनण्यास मदत मिळते. कुटुंबावर पडणारा आर्थिक भारही कमी होतो. त्यामुळे पालकांनी या शस्त्रक्रियेसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातील कान, नाक व घास विभाग येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.