पंजाब कॉंग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर
चंडीगढ -लोकसभा निवडणुकीसाठी मला उमेदवारी नाकारण्यामागे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि कॉंग्रेस प्रभारी आशा कुमारी असल्याचा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी मंगळवारी केला. त्या पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या आरोपामुळे पंजाब कॉंग्रेसमधी धुसफूूस चव्हाट्यावर आली आहे.
भाजपमध्ये असताना सिद्धू यांनी तीनवेळा पंजाबमधील अमृतसर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत केले. यावेळी पतीच्या जागी कॉंग्रेसकडून तिकीट मिळावे यासाठी कौर प्रयत्नशील होत्या.
मात्र, त्या मतदारसंघात कॉंग्रेसने विद्यमान खासदार गुरजितसिंग औजला यांना पुन्हा रिंगणात उतरवले. अमृतसरमधून लढण्याची शक्यता मावळल्यानंतर कौर यांनी चंडीगढमधून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉंग्रेसने तिथून माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना पसंती दिली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहावे लागल्याची नाराजी अखेर कौर यांनी उघड केली. यावेळी त्यांनी अमरिंदर यांचा उल्लेख ज्युनियर कॅप्टन तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख सीनियर कॅप्टन म्हणून केला. नाराजीमुळे कौर कॉंग्रेसच्या प्रचारापासून दूरच राहिल्या आहेत. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. त्या सर्व जागांसाठी अखेरच्या टप्प्यात (19 मे) मतदान होणार आहे.