बालिया – सत्तेत राहुन मी संपत्ती कमावली असेल किंवा विदेशी बॅंकांमध्ये पैसे ठेवले असतील तर ते सिद्ध करा असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले. येथील जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, मी या महामिलावटी लोकांना खुले आव्हान देतो. मी माझ्या नावावर बेनामी संपत्ती जमवली, फार्म हाऊस, शॉपिंग कॉम्पलेक्स बांधले किंवा विदेशी बॅंकांमध्ये पैसे ठेवले.
यापैकी एकही कृती माझ्या हातून घडली असेल तर ती सिद्ध करा असे ते म्हणाले. मी विदेशात कोठे मोठी मालमत्ता खरेदी केल्याचे अथवा महागडी कार घेतल्याचेही सिद्ध करा असे आवाहन त्यांनी केले. महामिलावटी लोकांनी माझ्यावर जे बेफाट आरोप केले त्याला मतदार मतदानातुनच उत्तर देईल असे ते म्हणाले. या महामिलावटी लोकांनीच सत्तेचा वापर करून अमाप संपत्ती कमावली त्यांचे नातेवाईक मालामाल झाले असा आरोपही त्यांनी केला.
सपा-बसपा आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की पुर्वी एकमेकांना शिव्या देणारे हे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले असून 23 मेच्या निकालानंतर ते पुन्हा एकमेकांना शिव्या देताना दिसतील. मायावती किंवा अखिलेश यांच्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदावर अधिक काळ राहिलो आहे. निवडणुका लढवताना मी कधीही जातीचा आधार घेतला नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.