पिंपरी – वारसा हक्काने मिळालेल्या रावेत येथील जमिनीचा कायद्याचे उल्लंघन करीत जबरदस्तीने ताबा मिळविला. याबाबत पोलीस कर्मचारी व अधिकारी गुन्हा नोंद करून घेण्याऐवजी जमीन बळकावणाऱ्या स्थानिक गुंडांनाच पाठीशी घालत असल्याची तक्रार रावेत येथील सागर अंकुश जाधव यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली होती. याची गंभीर दखल घेत आयोगाने पुणे जिल्हाधिकारी व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली असून 15 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहे.
सागर जाधव यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य डॉ. स्वारज विद्वान यांना 6 मे 2019 रोजी पत्र दिले होते. स. नं. 72/73 ही महार वतनाची जमीन मु. पो. रावेत, ता. हवेली येथे वारसा हक्काने मिळाली आहे. मात्र 2 मार्च 2019 रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या वॉचमनला मारहाण, शिवीगाळ करत तेथील झोपड्या तोडल्या. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलो असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. ही जमीन महार वतन असल्याचे (सन 2013 मधील 14/30/पुणे 2013 ईएसडब्ल्यू) अनूसूचित जाती आयोग यांच्या सुनावणीत स्पष्ट झाले आहे.
तथापि, पोलिसांनी जोरजबरदस्तीने आमचे हक्क डावलून आमच्या झोपड्या तोडल्या व दिवसभर त्याठिकाणी पोलिसांना तैनात केले आहेत. त्यामुळे आम्ही याठिकाणी आमच्या कुटुंब चरितार्थासाठी शेती करू शकत नाही. तरी आम्हाला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती जाधव यांनी आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य डॉ. स्वारज विद्वान यांनी पुणे जिल्हाधिकारी व पिंपरी पोलीस आयुक्त यांना नोटीस बजावली आहे. त्यांना 12 जून रोजी दुपारी 3 वाजता सुनावणीस हजर रहावे, असे आदेश दिले आहेत.