पुणे – अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका 20 मेपासून वाटप केली जाणार आहे. शहरातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेतून अकरावी माहितीपुस्तिका घ्यावीत, असे आवाहन अकरावी प्रवेश समितीने केले आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबाबत माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शाळांना व विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
अकरावी प्रवेश समितीकडून महापालिकेच्या हद्दीतील शाळांना 20 ते 25 मेदरम्यान माहितीपुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळेने दि. 20 पासून विद्यार्थ्यांना अकरावीची माहितीपुस्तिका वाटप करावयाचे आहे. दहावी परीक्षा दिलेले विद्यार्थी ही माहितीपुस्तिका घेऊ शकतील. त्यापूर्वी दि. 16 ते 20 मे या कालावधीत अकरावी प्रवेशप्रक्रियेची मुख्याध्यापक व तंत्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची उद्बोधन वर्गाचे आयोजन दि. 20 ते 25 मे दरम्यान करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागासाठी मार्गदर्शन केंद्र
शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतूनही अकरावीची माहितीपुस्तिकचे वाटप केले जाईल. मात्र, पुणे ग्रामीण अथवा अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी माहितीपुस्तिका मार्गदर्शन केंद्रावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी शहरातील तीन-चार महाविद्यालयात माहितीपुस्तिका ठेवले जातील. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.