प्रशासनाकडून हालचाली : प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
पुणे – आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय 65 वर्षांपर्यंत करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वय वाढविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिले आहेत.
याबाबतचे परिपत्रक औरंगाबाद विभागाच्या आरोग्य विभागाकडे प्रसिद्ध केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय आता 65 करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी आरोग्य संस्थांमधील दि. 1 मे 2019 पर्यंत कार्यरत अधिकाऱ्यांनी आपली वयाची माहिती सादर करणे आवश्यक आहे. तसेच, ही माहिती सेवा पुस्तकांनुसार तपासून व अचूक असल्याचे प्रमाणपत्र नमूद करावेत. यात निलंबित अधिकाऱ्यांचा समावेश करू नये, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, मध्यवर्ती कारागृह, पोलीस हॉस्टिपल, अस्थिव्यंग रुग्णालयाची माहिती सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या वयाबाबत दि. 10 मे पर्यंत माहिती सादर करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.