शहरातील टॅंकर फेऱ्यांचा आकडा 27 हजारांवर
पुणे – वाढलेला उन्हाचा चटका आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे शहरात एप्रिल महिन्यात पाण्याच्या टॅंकरच्या विक्रमी फेऱ्या झाल्या आहेत. 1 ते 30 एप्रिल या कालावधीत तब्बल 27 हजार 175 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच महिन्यात सुमारे 18 हजार 128 फेऱ्या झाल्या होत्या. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नगररस्ता आणि खराडी भागासह पालिकेत आलेल्या 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अचानक टॅंकरची मागणी वाढली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत अडीच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. हे पाणी शहराला दोन महिने पुरेल एवढे आहे. त्यामुळे पालिकेकडून जानेवारी महिन्यापासूनच शहरात दर गुरुवारी पाणी बंद ठेवले जात आहे. तर दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत अनिश्चित पाणीपुरवठा होत आहे. त्यातच, एप्रिल महिन्यात शहरात अनेक दिवस उन्हाचा पारा हा 40 च्या वर असल्याने पाण्याची मागणीही वाढली असली तरी दुसऱ्या बाजूला पालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहराच्या सर्व भागातून मोठ्या प्रमाणात अचानक टॅंकरची मागणी वाढली आहे. जानेवारी महिन्यात शहरातील पाण्याची टॅंकरची मागणी 19 हजार 639 होती. तर आकडा फेब्रुवारी महिन्यात 168 हजार 638 वर आला होता. तर मार्च महिन्यात यात 5 हजारांनी वाढ होऊन तो थेट 23 हजार 19 वर पोहोचला होता. तर आता एप्रिल महिन्यात हा आकडा 27 हजार 175 टॅंकरच्या फेऱ्यांवर जाऊन पोहोचला आहे. तर मे महिन्यातही हा आकडा 30 हजारच्या वर जाण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली.
11 गावांतून मागणी वाढली
टॅंकरची मागणी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमधून वाढली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ही गावे 2017 मध्ये महापालिकेत आली असली त्या आणि पुढच्या वर्षात धरणात पुरेसे पाणी होते. त्यामुळे या गावांना पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाण्यात कोणतीही कपात अथवा नियोजन नव्हते. मात्र, ही गावे शहरातच आल्याने शहरा प्रमाणेच या गावांचे नियोजन केले असल्याने त्या ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.त्यामुळे या भागात टॅंकरला अधिक मागणी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
तीन वर्षांतील एप्रिलची आकडेवारी
1) एप्रिल 2016-17 : 17 हजार 814
2) एप्रिल 2017-18 : 16 हजार 668
3) एप्रिल 2018-19 : 18 हजार 128
4) एप्रिल 2018 : 27 हजार 175