पिंपरी – थेरगाव येथील म्हातोबानगर झोपडपट्टीतील बालाजी गॅस एंटरप्रायजेस दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोट प्रकरणात अन्नपुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेतील तिघा जखमींचा भेट घेवून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. संघटना गेल्या अनेक वर्षापासून गॅसचा काळाबाजार रोखावा, यासाठी विविध मार्गाने लढा देत आहेत. थेरगावत घडलेल्या घटनेत अन्नपुरवठा विभागातील अधिकारी यांचा हलगर्जीपणा दिसून येतो.
स्थानिक व्यावसायिकांसोबत असलेल्या हितसंबंधामुळे कारवाई होत नसून हाच प्रकार शहरातील काळेवाडी, वाकड, भोसरी येथेही सुरु असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे तेथे पाहणी करुन तेथील बेकायदेशीर दुकानांवर पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे मच्छिंद्र चिंचोळे यांनी केली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.