पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी धावणार पीएमपीच्या 724 बसेस

प्रवाशांची होणार गैरसोय : पीएमपीला मिळणार एक कोटी 15 लाखांचे उत्पन्न

पिंपरी -लोकसभा निवडणुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीच्या) 724 बसेस वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत जिल्हा प्रशासानाने पीएमपीच्या व्यवस्थापनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार पीएमपी प्रशासनाकडून 724 बसेस घेतल्या जाणार आहेत. निवडणुकीच्या काळात रस्त्यावरुन तब्बल 724 बसेस गायब होणार असल्याने अनेक रुटवरील प्रवाशांना बसची वाट पहावी लागणार आहे. तसेच धावत असलेल्या बसेसमध्ये जास्त गर्दी होण्याची शक्‍यता आहे. प्रवाशांची गैरसोय जरी होणार असली तरी पीएमपीएला मात्र निवडणुकांमुळे एक कोटी 15 लाखांचे उतन्न मिळणार आहे.

निवडणुकीच्या काळात कर्मचारी वाहतूक आणि निवडणुकीचे साहित्य ने-आण करण्यासाठी पीएमपी सेवा उपयुक्‍त ठरते. त्यामुळे निवडणुक आयोगाने पीएमपी प्रशासनाकडे बसेसची मागणी केली आहे. राज्यात चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातील तिसऱ्या टप्प्यात पुणे आणि बारामती येथे 23 एप्रिल तर चौथ्या टप्प्यात मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार आवश्‍यक सर्व मतदान केंद्रावर साहित्य ने-आण करण्यासाठी 724 बसची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी पीएमपी व्यवस्थापनाकडे 1 कोटी 15 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे पीएमपीकडून सांग्ण्यात आले आहे.

निम्म्या बसेस रस्त्यावरुन होणार गायब

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1400 बसेस आहेत. तसेच पीएमपी सेवा देत असलेला परिसरही अतिशय मोठा आहे. यामुळे निम्म्याहून अधिक बसेस निवडणूक कामात जुंपल्या जाणार असल्याने याचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार आहे. 1400 बसेस पैकी काही बसेस नेहमीच रस्त्यात “ब्रेक डाऊन’ होत असतात, तर काही बसेसची अवस्थत्त अशी आहे की त्या आगारातूनच बाहेरच पडत नाहीत. पीएमपीच्या बसेसची अशी अवस्था असल्याने निम्म्या बसेस अचानक गायब होण्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणि प्रवाशांना फटका बसणार आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी पीएमपी प्रशासानाकडून नियोजन केले जाईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

“निवडणुकीसाठी पीएमपी बसेस दिल्या असल्याने प्रवाशांची काही दिवस गैरसोय होईल. मात्र, त्याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक घेवून मोक्‍याच्या मार्गावर नादुरुस्त बसेस दुरुस्त करुन बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे. जास्तीत-जास्त बसेस प्रवाशांना पुरवता येईल, याबाबत पीएमपी प्रशासन प्रयत्नशील आहे.
-संतोष माने, मुख्य समन्वयक, पिंपरी-चिंचवड पीएमपी

“निवडणूक काळात जवळपास पीएमपीच्या निम्या बसेस प्रवाशांसाठी वापरता येणार नसल्याने सामान्य प्रवाशांना मोठी गैरसोय होणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांने जर खासगी कंपनीच्या बसेस भाडे तत्वावर मागितल्या असत्या तर, त्या मिळाल्या असत्या मात्र पीएमपी प्रवाशांना कोणी वाली नसल्याने पीएमपी प्रवाशांचा आवाज दाबला जात आहे.
– संजय शितोळे, पीएमपी प्रवासी संघ अध्यक्ष, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.