नगर: भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगर शहरातील सावेडी येथील संत निरंकारी भवन शेजारील मैदानावर सभा होणार आहे. या मैदानावर ये-जा करण्यासाठी मोदी ज्या रस्त्यांचा वापर करणार आहे. त्या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. आज सकाळीपासून महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खड्डे असलेले रस्ते चकाचक झाले आहेत.
गंगाउद्यान ते जिल्हा पोलीस अधीक्षक दरम्यानच्या रस्त्याची महापालिकेने दुरुस्ती केली आहे. खड्डे असलेल्या ठिकाणी पॅचिंग करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर असलेले खड्डे निदान मोदी यांच्या दौऱ्यामुळे आज गायब झाले आहे. दि. 12 रोजी मोदींची जंगी सभा होणार आहे. मोदींचे नगर जिल्ह्याला मोठे आकर्षन आल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून रस्ते चांगले करण्यात येत आहे. या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. या तयारीबरोबर खड्डेयुक्त रस्ते दुरुस्तीची देखील आज दिवसभर करण्यात आली. त्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली होती.