जुन्नर-आंबेगाव-खेड तालुक्यात तारखांच्या गोंधळामुळे वाहनधारकांत नाराजी
खोडद- वाहनाचे पासिंग ऑनलाइन तारखेनुसार न केल्यामुळे जुन्नर-आंबेगाव-खेड या तालुक्यांतील वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयांतर्गत दररोज सकाळी आठ वाजता वाहनांच्या ऑनलाइन पासिंगसाठी पुढील तारखेची अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे. मात्र, सदरची तारीख चाळीस दिवसांनंतर पुढची येत असल्यामुळे वाहनधारकांची अडचण होत आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयांतर्गत दररोज सकाळी आठ वाजता ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची वेळ असते. यामध्ये एकूण शंभर गाड्यांचे अपॉइंटमेंट सुरू झाल्याबरोबर काही सेकंदात ते संपून जाते, तसेच काही वेळेला या अपॉइंटमेंट नेहमीची वेळ सोडून मध्येच ऑनलाइन अपॉइंटमेंट चालू होते आणि याची माहिती कुणालाच होत नाही. काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी ही अपॉइंटमेंटची “सेट्लमेंट’ चालू असल्याची चर्चा वाहन मालकांमध्ये चालू आहे.
रस्त्यावर विनापासिंग वाहन चालवणे धोक्याचे आहे. मात्र, काही वाहनधारक अपॉईंटमेंट तारखेच्या आधीच चिरीमिरी देऊन वाहन पासिंग करून घेत असल्यामुळे प्रामाणिकपणे अपॉइंटमेंट घेणाऱ्या वाहनधारकांचे यामध्ये नुकसान होत असून, असे बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या वाहन निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी वाहन मालकांकडून होत होती. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आता कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
- अशा प्रकारे दिलेल्या तारखेच्या अगोदर वाहनांचे पासिंग होत असल्यास किंवा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालय