-लहान मुले रानमेवा खाण्यात दंग; तरुणाईची गडकोटावर गर्दी
वेल्हे – रविवारपासून सुरू होणाऱ्या शिंमगो उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात कामधंद्यासाठी गेलेल्या चाकरमाने राजगड तालुक्याच्या विविध गाव, खेड्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली असून अनेकांचे आगमन दोन दिवस अगोदरच झाले आहे. त्यामुळे गावागावात वेगळ्याच प्रकारचे आनंदी वातावरण आहे. तर नात्यागोत्यातील मंडळी एकत्र येणार असल्याने रिकामी घरे वर्दळीने गजबजली आहेत. लहान मुले रानमेवा खाण्यामध्ये दंग असून तरुणाई गडकोटांवर जाणे पसंत करत असताना अनेकांच्या घरांमध्ये घावन आणि गावरान कोंबडी जेवणाचे बेत आखले जात आहेत.
घराला रंगरंगोट्या व घरासमोरील अंगणे सारवण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुलांचा गोंधळ, तरुणाईच्या मजा आणि ज्येष्ठांच्या गप्पा याने गावात वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे राजगड तालुक्याच्या गाव खेड्यात खराखुरा शिंमगोत्सव अनुभवला जात आहे. काही लोक स्वतःच्या छोट्या मोठ्या गाड्या घेऊन आले आहेत.
तर काही मंडळींनी प्रवाशी वाहनाने येणे पसंत केले आहे. गावाकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी मुलं आणि शहरांमध्ये शिकणारी मुलं यांच्यातील विविध खेळ आणि शालेय विषयावरील गप्पा यातील स्पर्धा हे पाहताना खरी मजा पाहायला मिळते. खरोखर लहानपणाची आठवण करून देणारे हे प्रसंग आई, वडील व ज्येष्ठ मंडळी आवर्जून पाहताना दिसतात.
गावकीचे चित्र पाहण्यासारखे…
या भागातील अनेक लोक कामधंद्यासाठी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतात प्रामुख्याने पुणे, मुंबई, ठाणे, सुरत या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. छोट्या मोठ्या नोकऱ्यांबरोबरच, रिक्षा चालवणे, रखवालदार, आईस्क्रीम स्टॉल, कुल्फी विकणे, रसाचे गुऱ्हाळ चालविणे, असे व्यवसाय करतात. मात्र, कितीही अडचण असली तरी ही मंडळी या शिंमगोत्सवासाठी आवर्जून गावाकडे येतात. घरातील कामांबरोबरच गावकीत सहभागी होतात आणि हे सर्व चित्र शहरी लोक गावाकडे येऊन अनुभवतात.