दुधाला प्रति लिटर पाच रुपये लिटरप्रमाणे अनुदान मिळाले
नारायणगाव – दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळाल्याने हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गवळ्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी दुधाला फॅट तीन पाच व एस.एन.एफ. आठ पाच गुणप्रतीसाठी 27 रुपये भाव दिल्यास राज्य शासनाकडून प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजना 11 जानेवारी ते 10 मार्च 2024 कालावधीसाठी राबविण्यात आली.
योजनेसाठी अनेक सहकारी आणि खासगी संस्थांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गवळ्यांना लाभ मिळवून देणारी जिल्ह्यातील कळमजाई सहकारी दूध उत्पादक संस्था प्रथम क्रमांकाची ठरली आहे.
अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी संस्थेचे मदतनीस पंकज शिंदे यांनी कागदपत्रे जमा केली तर संस्थेची माहिती देण्याचे काम सचिव मनीष मोरडे यांनी केले. अनुदान जमा झाल्यानंतर सचिव मोरडे व गवळ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला.
शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत असताना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, जिल्हा दुग्धविकास अधिकारी सतीश डोईफोडे, सहाय्यक निबंधक (दुग्ध) खंबायत, पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. जी. लामखडे, कात्रज संघाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. खलील मणियार, कळमजाई संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद, दूध उत्पादक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.