Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दरम्यान या गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी माध्यमांशी बोलतांना या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली की,’मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता. काल संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी धक्काबुक्की केली. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला या कृत्याचा पश्चाताप नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील, तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला.’ सध्या या संदर्भातील बाईट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गणपत गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाला की, ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी असे गुन्हेगार राज्यभर पाळून ठेवले आहेत. शिंदे मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. तसेच माझ्यावर अन्याय होत असल्याची कल्पना वरिष्ठांना दिली होती,’ असं म्हणत गायकवाड यांनी शिंदेंवर टीका केली आहे.