पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच आमदार रोहित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वय हे ६५ च्या घरात आहे. त्याच्यामुळे अजितदादा ‘सीनियर सिटिझन’ आहेत. काकाच्या नात्याने ते रोहित पवार यांना ”बच्चा” बोलले, अशी खोचक टीका सुळे यांनी केली आहे.
सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कोणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र, शरद पवार यांनी अजितदादांचे कोणकोणते हट्ट पुरविले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते ज्या पद्धतीने म्हणतात, ‘मी सोळा तास काम करतो’, त्याच पद्धतीने आम्हीही सोळा-सोळा तास काम करतो. मात्र, माध्यमांसमोर येऊन बोलणं हा आमचा जॉब नाही. नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडणे, ते प्रश्न सोडवून घेणे, हा आमचा जॉब आहे आणि तो आम्ही सातत्याने करत आहोत. आरेला-कारे करणे सोपे आहे. मात्र, समोरच्याचं ऐकून घेऊन शांत बसणं अवघड काम आहे.
महापालिका आयुक्तांची भेट
बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या पुणे शहर आणि लगतच्या गावांतील विविध नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी सुळे यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. पाणी, कचरा व वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली आहे. पोलीस आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने वाहतूक नियोजनासाठी वॉर्डनचा परिणामकारक फायदा होत नाही. पाण्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक बोलावून योग्य ते नियोजन करावे, अशीही मागणीही सुळे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सुळे म्हणाल्या.