पुणे – विद्यार्थी संघटनांची आंदोलने, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नवीन कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली होती. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावित एसओपीला विद्यापीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, विद्यापीठ सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते.
विद्यापीठात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी विद्यापीठाने विद्यार्थी, कर्मचारी संघटनांच्या कार्यक्रम, उपक्रम, आंदोलनांसाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचे ठरवले होते. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी या एसओएपीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थी संघटनांना उपक्रम, कार्यक्रमांसाठी किमान पाच दिवस आधी पूर्वपरवानगी, निश्चित केलेल्या जागेतच कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्याचे बंधन घालण्यात आले असून, विद्यापीठाचे नुकसान न होण्याबाबतचे लेखी हमीपत्रही द्यावे लागणार, असे मुद्दे प्रस्तावित एसओएपीमध्ये मांडण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी असे नियम असू नयेत,अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यावर विद्यापीठाचे डाॅ. विजय खरे यांनी एसओपीला सध्या स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठातील वातावरण शांततामय राहण्यासाठी सहयोग करणार असल्याची हमी दिली.
“विद्यापीठ प्रशासनाकडून आंदोलनासाठी जाचक अटी लादल्या होत्या. सर्व विद्यार्थी व युवक संघटनांचा विरोध पाहून प्रशासनाला एसओपीचा निर्णय मागे घ्यावा लागला. पोलिसांचा हस्तक्षेप मान्य नव्हता. अखेर विद्यापीठाने रद्द केलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व यापुढे परत काहीही, असे निर्णय होणार नाही याची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी.” – अक्षय जैन, अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (माध्यम विभाग)