सोनई – राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या व जलद गाड्या वडाळ्याजवळील अनधिकृत बसथांब्यावर एक तासभर थांबा घेत असल्याने प्रवासी खासगी वाहनाकडे वळले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे.
एसटी महामंडळाच्या बस वडाळ्यानजीक जेवणासाठी थांबत असल्याने तेथे कमीत कमी एक तास जातो. या वेळात प्रवासी तोपर्यंत नगरला पोहोचतो. येथे शंभर मीटर अंतरामध्ये दोन बसथांबे असून, नेवाशाहून बसणारा प्रवासी हकनाक एक तासभर थांबल्याने त्याला पुढील प्रवासासाठी व पुढील बस मिळेल की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे तो खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळाला आहे. हे दोन्ही बसथांबे अनधिकृत असून, एसटीच्या कोणत्याही कार्यालयाने अधिकृत बस थांबा दिला नसताना या बस येथे कोणाच्या सांगण्यावरून थांबतात? अधिकृत थांबण्याचा परवाना नसताना व या हॉटेलला सरकारने बसथांब्याची परवानगी दिली नसताना चालक बस येथे का थांबवितात, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
याबाबत आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता आम्ही कुठलीही परवानगी या ढाबेवाल्यांना दिलेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मग चालक व वाहकांकडून या ढाब्यांवर बस कशी थांबविण्यात येते, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक तडजोडीतून हा प्रकार होतो का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाला यामुळे तोटा सहन करावा लागत आहे
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असताना महामंडळाचे चालक व वाहकच या योजनांना हरताळ फासण्याचे काम आहे. कर्मचाऱ्यांच्या अशा हेकेखोरीमुळे प्रवासी एसटीपासून दूर चालले आहेत. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
थांबा बनला अवैध वाहनांचा अड्डा!
ज्या गावात अधिकृत बसथांबा आहे, त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रक नसतो. घोडेगावात तर चक्क बस वाहतूक नियंत्रक कार्यालयासमोरच बसऐवजी खासगी अवैध वाहतूक करणारे वाहने भरताना दिसतात. त्या ठिकाणी बस उभी करायला जागासुद्धा नसते. त्यामुळे बसेस रस्त्यावरच उभ्या राहतात. त्यामुळे हा बसथांबा आहे की अवैध वाहनांचा थांबा आहे असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. पांढरी पूल ते उस्थळ दुमालादरम्यान असलेल्या अनधिकृत बसथांब्यामुळे वेळेवर बस येत नसल्याने विद्यार्थीदेखील पास असूनसुद्धा हैराण झाले आहेत.
अहमदनगर ते नेवासा फाटादरम्यान कोणत्याही खासगी हॉटेलला एसटी महामंडळाने अधिकृत बस थांबा दिलेला नाही. ज्या खासगी हॉटेलवर बस थांबतात, त्या चालक व वाहकाला पाचशे रुपयांचा दंड करण्यात येतो.
– अ. का. कल्हापुरे, प्रबंधक, राज्य परिवहन महामंडळ, अहमदनगर विभाग