नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव एसटी महामंडळाच्या आगर प्रमुखांनी नारायणगाव खोडद एसटी बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
एसटी महामंडळाच्या नारायणगाव आगारच्या आडमुठेपणामुळे खोडदवरून नारायणगावला प्रवास करणार्या प्रवाशांना व शिक्षणासाठी ये- जा करणार्या विद्यार्थ्यांना भर उन्हात पायी प्रवास करावा लागत आहे. यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे.
नारायणगाव येथील तेली ओढ्यात रस्त्याचे काम सुरू असल्याने गेल्या 20 दिवसांपासून नारायणगाव डेपोने खोडदकडे जाणार्या एसटी बसेस बंद केलेल्या आहेत. खोडदकडे एसटी बस जाण्यासाठी नारायणवाडी अथवा मांजरवाडी रस्ता असूनही आगार प्रमुखांनी रस्त्याचा सर्व्हे करण्याचे थातूरमातूर कारण सांगून एसटी सेवा बंद केली आहे.
खोडद ग्रामपंचायतने दि. 3 मे रोजी नारायणगाव एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखांना बस सुरू करण्यासाठी पत्र दिले आहे; परंतु आगार प्रमुखांनी खोडद ग्रामपंचायतने दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखवली की काय? असा प्रश्न खोडद ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थी, प्रवासी आक्रमक
नारायणगावचे एसटी महामंडळाचे आगारप्रमुखांकडून प्रवाशांना जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी दिला आहे.