पुणे – सातबारा उताऱ्यामध्ये यापूर्वी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सोयाबीन आदींसह फक्त 20 पिकांचीच नोंद होत होती. आता मात्र ई पीक पाहणी या मोबाईल अॅपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने नव्याने विविध प्रकारच्या सुमारे 450 पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होऊ लागली आहे.
ई पीक पाहणी सुविधेमुळे यापूर्वी कधीच नोंदविण्यात न आलेली पिके सातबारा उताऱ्यावर नोंदविली आहे. यामुळे राज्य शासनाला पिकांची अचूक माहिती मिळत आहे. तसेच गावनिहाय पिकांची आकडेवारी उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर जमिनीचे महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना नं.7 हा “अधिकार अभिलेख’ विषयक असून गाव नमुना नं 12 हा “पिकांची नोंदवही’ ठेवण्यासंदर्भात आहे.
गाव नमुना नंबर 12 मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असतात. पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी हे पीक पेरणी अहवालाच्या नोंदी नमूद करतात. मात्र, अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदी अद्ययावत होत नाहीत. यापार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने हे अॅप विकसित केले.
यंदाच्या खरीप हंगामात पुणे जिल्ह्यात 1 लाख 11 हजार 230 हेक्टर जमिनीवर 152 पिकांची नोंद झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात सोयाबीन हे पीक सर्वाधिक घेतले जात असल्याचे समोर आले आहे. तब्बल 32 हजार 230 हेक्टर वर हे पीक घेण्यात आले आहे. त्याखालोखाल बाजरीचे पीक 20हजार 847 हेक्टरवर घेण्यात आले आहे. तर भात पीक 16 हजार 742 हेक्टरवर घेण्यात आले आहे.
ई पीक पाहणी या ऍपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलिहाऊस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या अॅपमध्ये 580 पिकांची नोंदी घेता येत आहेत, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आली.